सुपर ओव्हरही ‘टाय’…मात्र चौकार जास्त असल्याने इंग्लंड विश्‍वविजेता

wc 2019

लंडन वृत्तसंस्था । शेवटच्या क्षणांपर्यंत रंगलेला विश्‍वचषकाचा अंतिम सामना टाय झाल्याने निर्णय सुपर ओव्हरच्या माध्यमातून झाला. मात्र यातही ‘टाय’ झाल्याने डावात जास्त चौकार मारणार्‍या इंग्लंडने विश्‍वविजेतेपद पटकावले.

आज विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतीम सामना इंग्लंड आणि न्यूझिलंड यांच्यात खेळला गेला. यात न्यूझिलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. तथापि, यजमान संघाच्या गोलंदाजांच्या अचूक गोलंदाजीने किवीजला मुक्तपणे फलंदाजी करता आली नाही. ख्रिस वोक्सने मार्टिन गप्टिलला(१९) पायचीत करत न्यूझिलंडला पहिला धक्का दिली. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसनने डाव सावरण्याची प्रयत्न केला असला तरी प्लंकेटने विल्यमसनला(३०) बाद केले. निकोल्सने एक बाजू लाऊन धरली तरी प्लंकेटने निकोल्सला ५५ धावांवर बाद केले. यानंतर टॉम लॅथमने चांगली फलंदाजी करून न्यूझिलंडला २४१ धावसंख्या करण्यासाठी मदत केली.

दरम्यान, २४२ धावांचे माफक आव्हान घेऊन उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरवात चांगली झाली नाही. न्यूझीलंडच्या गोलंदाजांची टिच्चून गोलंदाजी केल्यामुळे यजमान फलंदाजांची सावध सुरूवात केली. हेन्रीने जेसन रॉयला परत पाठविले. तर ग्रँडहोमने जो रूटला बाद केले. बेअरस्ट्रो ३६ धावा करून बाद झाला. कर्णधार मॉर्ननही लवकरच परतला. नंतर बटलर व स्टोक्सने डाव सावरला. फर्ग्युसनने बटलरला ५९ धावांवर बाद केले. तर यानंतर क्रमाक्रमाने गडी बाद होत गेले. एका बाजूने स्टोक्स टिकून असल्यामुळे इंग्लंडच्या आशा जिवंत होत्या. शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी १५ धावा आवश्यक होत्या. यातील तिसर्‍या चेंडूवर स्टोक्सने षटकार हाणला. यामुळे तीन चेंडूत नऊ धावांची आवश्यकता होती. यानंतर एका चेंडूवरू दोन धावा मिळाल्या. मात्र फलंदाजाला चेंडू लागून सीमापार गेला. यामुळे या सहा धावा मिळाल्या. यामुळे दोन चेंडूमध्ये तीन धावांची आवश्यकता होती. येथे एक धाव निघाली तरी आदील रशीद बाद झाला. यामुळे एका चेंडूवर दोन धावांची आवश्यकता होती. मात्र एकच धाव निघाल्याने सामना टाय झाला. यामुळे निर्णय सुपर ओव्हरवर गेला.

दरम्यान, नियमानुसार दुसरी फलंदाजी असणार्‍या इंग्लंड संघाला सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी मिळाली. यात बेन स्टोक्स आणि बटरलची जोडी मैदानात उतरली. न्यूझीलंडतर्फे बोल्टने षटक टाकले. पहिल्या चेंडूवर स्टोक्सने तीन धावा घेतल्या. दुसर्‍या चेंडूवर बटलरने एक धाव घेतली. तिसर्‍या चेंडूवर स्टोक्सने चौकार मारला. चौथ्या चेंडूवर फक्त एक धाव मिळाली. पाचव्या चेंडूवर दोन धावा तर सहाव्यावर चौकार मिळाला. यामुळे न्यूझिलंडला विजयासाठी सहा चेंडूत १६ धावांचे आव्हान मिळाले.

दरम्यान, न्यूझिलंडने गप्टील आणि निशमला फलंदाजीसाठी उतरवले तर इंग्लंडतर्फे जोफ्रा आर्चरने षटक टाकले. यातील पहिल्याच चेंडू वाईड गेल्याने एक धाव मिळाली. यानंतर या चेंडूवर दोन धावा मिळाल्या. दुसर्‍या चेंडूवर निशमने स्टेडीयममध्ये टोलविले. तिसर्‍या चेंडूवर दोन धावा मिळाल्या. पुन्हा दोन धावा मिळाल्या. यामुळे दोन चेंडूत तीन धावांचे लक्ष बाकी राहिले. यानंतर फक्त एक धाव मिळाली. यामुळे शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या होत्या. येथे फक्त एक धाव मिळाली. यामुळे सुपर ओव्हरही टाय झाली तरी डावात जास्त चौकार मिळाल्याने इंग्लंड विश्‍वविजेता बनला.

Protected Content