रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू असून नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कारणीभूत ठरत आहे. अतिक्रमण धारक मनासारखे ठिकाणी टप-या ठेवत आहेत, तर काही ठिकाणी बांधकाम सुरू आहे.यामुळे शहरातील रस्ते प्रचंड अरुंद झाले असून मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्षमुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
शहरात दिवसा-ढवळ्या अतिक्रमण सुरू असून नगर पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर लोडगाड्या अतिक्रमण करत आहेत. तसेच जुना सावदा रस्ता, पोलिस स्टेशन परिसर, स्टेशन रोड, उटखेडा रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बुरहाणपूर महामार्ग या सर्व ठिकाणी अतिक्रमण वाढले आहे. यामुळे शहरातील रस्ते अरुंद होत आहेत आणि शाळकरी विद्यार्थ्यांना वाहनांमुळे ये-जा करण्यात अडचणी येत आहेत.
नगर पालिकेने वेळेत उपाय न केल्यास शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याबाबत जनतेत नाराजीचा सूर उमटत आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असतानाही कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढली आहे. नगर पालिकेने त्वरित अतिक्रमण हटवण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.शहरातील अतिक्रमणामुळे रहदारीची समस्या वाढली असून यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. नगर पालिकेने त्वरित लक्ष घालून अतिक्रमण हटवावे,अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.