अखेर एसटी कर्मचाऱ्यानी अर्धी लढाई जिंकली – लेखी निर्णयाची प्रतिक्षा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात राज्यातच नव्हे तर देशात ऐतिहासिक संप म्हणून नोंद झालेल्या एसटी कर्मचाऱ्यानी अर्धी लढाई जिंकली असून कोविड भत्ता, निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युएटीचा लाभ देण्यात यावेत, असे आदेश देत कर्मचाऱ्याना २२ एप्रिलपर्यत मुदतवाढ देत कामावर येण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.  जळगाव विभागातील संपकरी कर्मचारी या लेखी निर्णयाची प्रतिक्षा करीत आहेत.

राज्यात १ तर जिल्ह्यात ७ नोव्हेंबर २०२१ पासून विलीनीकरण आणि कोविड काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना शासन स्तरावरून मदत देण्यात यावी यासाठी दुखवटा म्हणून एसटी कर्मचाऱ्याचा संप सुरु होता. त्यावर कोविड भत्ता, निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युएटीचा लाभ देण्यात यावेत, असे आदेश देत कर्मचाऱ्याना २२ एप्रिलपर्यत मुदतवाढ देत कामावर येण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

जिल्ह्यात कोविड संसर्ग काळात अनेकांना उपचार होऊन देखील किंवा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यला सामोरे जावे लागले. यात अगोदरच कमी वेतन तसेच कौटुंबिक आर्थिक विवंचनेमुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यानादेखील याचा सामना करावा लागला.

दरम्यान संसर्ग काळात आर्थिक विवंचनेमुळे एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची पहिली घटना जळगाव जिल्ह्यातच घडली. त्यानंतर आपल्या न्याय्य मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यानी अखेर २४ ऑक्टोबर रोजी काम बंद आंदोलनाचे हत्यास उपसले, यावर राज्य शासनाने महागाई, घरभाडे भत्ता, बोनस असे लाभ एसटी कर्मचाऱ्याना लागू केले. परंतु दिवाळीनंतर पुन्हा चार पाचच दिवसात विलीनीकरण आणि कोविड काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना शासन स्तरावरून मदत देण्यात यावी यासाठी दुखवटा म्हणून जळगाव जिल्ह्यातील ११ आगारातील एसटी कर्मचाऱ्यानी बेमुदत काम बंद आंदोलन केले.

विलीनीकरणासह अन्य न्याय्य मागण्यासाठी संप करत असताना गेल्या पाच महिन्याच्या काळात सर्वसामान्य नागरिक, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, परीक्षार्थी, नोकरदार चाकरमान्यांना सार्वजनिक वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेक अडचणीना सामोरे जावे लागले हे देखील तितकेच खरे आहे.

राज्य शासन, प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहने, प्रलोभन, बदली, बडतर्फी, सेवासमाप्ती बडतर्फीची तसेच नुकसानभरपाईची नोटीस अशा कारवाया करण्यात आल्या, दरम्यान जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या आणि धसक्याने मृत्यू अशा घटना घडल्या, प्रशासन आणि सरकारकडून अल्टीमेटम मिळूनही एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यानी चिवटपणे संपावर ठाम राहत न्यायालयीन लढाई लढत राहिले.

यात राज्य सरकारने न्यायालयाच्या सूचनेनुसार काही मागण्या मान्य करीत संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश देत कामावर येण्याचे आदेश दिल्याने अखेर एसटी कर्मचाऱ्यानी अर्धी लढाई जिंकली असून कोविड भत्त्यासह निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युएटीचा लाभ या संपकरी कर्मचाऱ्याना मिळाला असून जळगाव विभागातील संपकरी कर्मचारी या लेखी निर्णयाची प्रतिक्षा करीत आहेत.

Protected Content