डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी स्वीकारला अधिष्ठाता पदाचा कार्यभार

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नवीन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून त्यांच्या समोर सरकारी आरोग्य यंत्रणेला कार्यक्षम करण्याचे मोठे आव्हान आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार उडाला असून याचा प्रतिकार करण्यात प्रशासन साफ अयशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. यातच सिव्हील हॉस्पीटलमधील शौचालयात एका महिलेचा मृतदेह तब्बल आठ दिवस पडून असल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली असून यामुळे जनमानस संतप्त झाले आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून शासकीय वैद्यकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्करराव खैरे यांच्यासह पाच अधिकारी व तीन कर्मचार्‍यांना निलंबीत करण्यात आले आहे. तर याच प्रकरणात सदोष मनुष्यबधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, डॉ. भास्करराव खैरे यांच्या जागेवर डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. आज त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. भोंगळपणामुळे बदनाम झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार पारदर्शक आणि सक्षम करण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर आहे.

Protected Content