नाशिकमध्ये अकरावे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन

नाशिक-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | लेखणीतून शेतीची दुरवस्था थांबवून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली, सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण व्हावी, या उद्देशाने येत्य ४ व ५ मार्चला नाशिकमध्ये अकरावे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन होत आहे.

अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी ही माहिती दिली. शेतीला भेडसावणाऱ्या दाह वास्तवाची जाणीव मराठी साहित्य विश्‍वाला होण्याच्या उद्देशाने हे संमेलन होत आहे. दहा वर्षांपासून या उपक्रमात सातत्य राखण्यात आले असून, यंदाचे संमेलन ११ वे असेल.

शेती उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करून शेतीउद्योगाला नवी दिशा देणाऱ्या मोहाडी (जि. नाशिक) येथील सह्याद्री फार्म्स परिसरात हे संमेलन भरत आहे. ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक भानू काळे संमेलनाचे अध्यक्ष असतील. नाम फाउंडेशनचे संस्थापक तथा चित्रपट अभिनेते नाना पाटेकर संमेलनाचे उद्‍घाटन करतील. ज्येष्ठ शेतकरी नेत्या सरोज काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेते अ‍ॅड. वामनराव चटप प्रमुख पाहुणे असतील.

सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे स्वागताध्यक्ष असून, गंगाधर मुटे कार्याध्यक्ष आहेत. तसेच संयोजक म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतीश बोरुळकर यांची निवड करण्यात आली. संमेलनसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून, त्यात प्रमोद राजेभोसले, ज्ञानेश उगले, शंकरराव ढिकले, सोपान संधान, निवृत्ती कडलग, प्रा. डॉ. कुशल मुडे, दिलीप भोयर, रवींद्र दळवी, सारंग दरणे, गणेश मुटे यांचा समावेश आहे.

Protected Content