राज्यभरात ईव्हीएममध्ये बिघाडसत्र ; चोपडा,अमळनेरमध्ये काही ठिकाणी उशिराने मतदान सुरु

 

chopda 4

 

मुंबई / जळगाव (प्रतिनिधी) उन्हाचा ताप टाळण्यासाठी राज्यभरात ठीकठिकाणी सकाळी-सकाळी मतदान केंद्रावर गेलेल्या मतदारांना ईव्हीएम बंद पडल्याने मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे अनेकजण मतदान न करताच संतापात माघारी परतल्याचे वृत्त आहे. दरम्यान, चोपडा तालुक्यात दोन केंद्रांवर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाडामुळे उशिराने मतदान सुरू झाले. तर अमळनेर येथे जी एस हायस्कूल मतदान केंद्रावर 20 मिनिटे उशिराने मतदान सुरू झाले  होते. राज्यात सर्वाधिक ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी माढ्यातून समोर आल्या तक्रारी आहेत.

 

 

मुंबईजवळील अलिबाग विधानसभा मतदार संघात थळ चाळमळा साई मंदिर मतदान केंद्र मशीन बिघडल्यामुळे सकाळी 9 वाजता मतदान सुरु झाले आहे. तर सांगलीत गुजराती हायस्कुलमध्ये मशिन बंद पडल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला. तासभर वाट पाहून पर्यायी व्यवस्था नसल्याने अनेकजण मतदान न करता माघारी परतले. तर माढा लोकसभा मतदार संघातील सांगोला जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक 158,160 वरील मशीन बंद होते. याच मतदारसंघातील सांगोला येथील भोपळे रोडवरील मराठी शाळा नंबर 1 येथील मतदान केंद्र 140 मधील मशीन एक तास झाले बंद पडले होते. यामुळे मतदार खोळंबून निघून गेले. तसेच न्यू इंग्लिश स्कूल मतदान केंद्र 155 मशीन बंद असल्यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली होती. तर भीमनगर येथे मतदान केल्यानंतर मशीनचे बटन दाबले जात नव्हते. त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली होती.

 

 

दरम्यान, औरंगाबाद येथील बुथ क्रमांक 211, 210 आणि 161 वर ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता. यामुळे मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचप्रकारे औरंगाबादमधीलच मतदान केंद्र क्रं.222, 219 वरील मशीन तासभर सुरू न झाल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला. डोकेवाडी ( ता.श्रीगोंदा ) मतदान केंद्रावर अर्धा तास उशीराने मतदान सुरू झाले. तर काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडले होते. कोल्हापूरमध्ये सात ठिकाणी ईव्हीएम मशीन सुरूच झालेल्या नसल्याने मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. सातारातील जवळवाडी ( मेढा) येथे मतदान मशिन नादुरूस्तीमुळे ४५ मिनिटे उशिराने मतदानाला सुरूवात झाली. जालन्यातील टाकळी अंबड येथे गेल्या दीड तासापासून मतदान यंत्र बंद आहे.

Add Comment

Protected Content