मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या काही वर्षांपासून वाढत्या वीजदरांमुळे राज्यातील प्रत्येक सरकारला जनतेच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले आहे. करोनाच्या काळात लॉकडाऊन असताना राज्यातील लाखो कुटुंबांना अवास्तव वीजबिल भरावे लागले होते. त्यावेळीही सरकारला जनतेच्या संतापाला तोंड द्यावे लागले होते. अशा परिस्थितीत महायुती सरकारने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वीज दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते.
आज राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील वीज दर कमी होणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या मते, राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील, यासाठी सरकार नियोजनबद्ध पद्धतीने काम करणार आहे.
वीज दर कमी करण्यासाठी सरकारचे नियोजन
अजित पवार म्हणाले, “महावितरण कंपनीने पुढील पाच वर्षांसाठी वीज दर निश्चित करण्यासाठी प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षांमध्ये राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील.”
राज्यातील नागरिकांसाठी आणि उद्योगांसाठी ही घोषणा दिलासादायक ठरू शकते. वाढत्या वीजदरांमुळे अनेक उद्योगांनी महाराष्ट्राबाहेर जाण्याचा विचार केला होता. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे उद्योगांना स्थिरता मिळेल आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा गुंतवणुकीसाठी आकर्षक राज्य ठरेल, अशी अपेक्षा आहे.