जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कानळदा येथील ६० वर्षीय वयोवृध्दाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीला आली. याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शरद संपत राणे (वय ६०) रा. कानळदा ता.जि.जळगाव असे मयत वयोवृध्दाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.
याबाबत माहिती अशी की, कानळदा येथे शरद राणे पत्नी अलकाबाईसह वास्तव्यास होते. मंगळवारी अलकाबाई ह्या जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर पसिरात वास्तव्यास असलेल्या मुलीकडे आल्या होत्या. काम आटोपल्यावर त्या दुपारी पुन्हा गावी कानळदा येथे परतल्या. घरी पोहचल्या असता, दरवाजा उघडताच त्यांना घरात पती शरद राणे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी मयत शरद राणे यांचे जावई पंकज डिगंबर नारखेडे यांच्या खबरीवरुन तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत शरद राणे यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, जावई असा परिवार आहे. पुढील तपास हरिलाल पाटील हे करीत आहेत.