जळगाव ग्रामीणमधून अत्तरदे पती-पत्नी अन लकी टेलर यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

 

umedvar

धरणगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण मतदार संघातून राष्ट्रवादीतर्फे पुष्पाताई महाजन यांचे नाव जाहीर झाल्यानंतर आता नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, कृउबाचे माजी उपसभापती लकी टेलर आणि माधुरी अत्तरदे हे तिघे जण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून आज (दि.३) तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

 

जळगाव ग्रामीणमधून भारतीय जनता पक्षाने सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना जेरीस आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघातील विविध मेळाव्यांमधून याची प्रचिती येऊ लागली आहे. भाजपचे नेते उघडपणे ना. पाटील यांच्यावर टीका करतांना दिसून येत आहेत. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून बाजार समितीची माजी सभापती लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर अथवा भुसावळचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांच्यापैकी एक जण उमेदवारी करून भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यासाठी मैदानात उतरतील असे मानले जात होते. यात राष्ट्रवादीने विशाल देवकर यांना तिकिट दिल्यास लकी टेलर अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता होती. तर अन्य उमेदवार असल्यास चंद्रशेखर अत्तरदे उमेदवारी करणार असे ठरविण्यात आले होते.

या पार्श्‍वभूमिवर, आता राष्ट्रवादीने धरणगावच्या माजी नगराध्यक्षा पुष्पाताई ज्ञानेश्‍वर महाजन यांना उमेदवारी दिल्याने अत्तरदे मैदानात उतरतील, असे निश्‍चित झाले आहे. चंद्रशेखर अत्तरदे हे भुसावळ नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक आहेत. त्यांच्या सौभाग्यवती माधुरी अत्तरदे या साळवा-साकरे गटातून भाजपतर्फे जिल्हा परिषदेत निवडून आल्या आहेत. तर त्यांच्या मातोश्री या जळगाव महापालिकेतील नगरसेविका आहेत. अर्थात तीन वेगवेगळ्या ठिकाणचे प्रतिनिधीत्व अत्तरदे परिवार करत आहे. आता ते स्वत: जळगाव ग्रामीणमधून आपले नशीब आजमावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content