कंपनीच्या वितरक परवान्याचे आमिष दाखवत वृध्दाची ९ लाखात फसवणूक !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कंपनीचा मुद्देमाल जळगाव जिल्ह्यात विक्री करण्यासाठी वितरक परवाना काढून देण्याचे आमिष दाखवून, दादावाडी येथे राहणाऱ्या एका वृद्धाची ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंगळवार, १ जुलै रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील दादावाडी परिसरात राहणारे शिवाजी सिताराम पाटील (वय ६३) हे त्यांच्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. त्यांना संशयित आरोपी दीपक लोटन खैरनार (वय ६०) आणि नितीन गुणवंतराव सोनवणे (वय ६४) (दोघे रा. गणेशवाडी, जळगाव) यांनी गाठले. या दोघांनी शिवाजी पाटील यांना कंपनीचा मुद्दामाल जिल्ह्यात विक्री करण्यासाठी वितरक परवाना (distributor license) काढून देण्याचे आमिष दाखवले.

या आमिषाला बळी पडून शिवाजी पाटील यांनी वेळोवेळी दीपक खैरनार आणि नितीन सोनवणे यांना एकूण ९ लाख रुपये दिले. मात्र, पैसे घेऊनही आरोपींनी त्यांना वितरक परवाना काढून दिला नाही, उलट त्यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवाजी पाटील यांनी तातडीने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.

त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी, १ जुलै रोजी दुपारी १ वाजता दोन्ही आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा (४२०) दाखल करण्यात आला आहे. ही आर्थिक फसवणूक असल्याने, हे प्रकरण पुढील तपासासाठी जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.