जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असून ते २० डिसेंबरला या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासाठी सध्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे पर्याय खुले असल्याचे आधीच स्पष्ट झालेले आहे. या पार्श्वभूमिवर, ते नेमक्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. दरम्यान, ताज्या घडामोडींचा मागोवा घेतला असता नाथाभाऊ हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ते २० डिसेंबरला राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता असून मंत्रीमंडळाच्या विस्तारात त्यांना कॅबिनेट खाते मिळू शकते.
राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीतच एकनाथराव खडसे यांना प्रवेशाची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी याचा स्वीकार केला नव्हता. या निवडणुकीत राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेल्या चंद्रकांत पाटील यांनी नाथाभाऊंची कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आपल्या पक्षांतर्गत विरोधकांविरूध्द दंड थोपटले असून याचमुळे ते भाजपचा त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे.