मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | चिन्हाच्या लढाईवरून पुन्हा एकदा शिंदे गट सुप्रीम कोर्टात गेला आहे.
शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने आता सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. या गटाने सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवावी, निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये, अशी मागणी शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे. तसंच, सुप्रीम कोर्टानं त्वरीत सुनावणी घ्यावी आणि निवडणूक आयोग प्रक्रीये संदर्भात निर्णय द्यावा, अशी विनंतीही शिंदे गटाने केली आहे.
शिवसेनेचे पक्षचिन्ह मिळवण्यासाठी शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती दिली होती. या वादावर ५ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले आहे. या प्रकरणावर सुनावणी कधी होणार आहे, याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यातच आता शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने या प्रकरणी नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी पक्षाचे चिन्ह आपल्यालाच मिळावे यासाठी ठाकरे आणि शिंदे यांच्यात लढाई सुरू असतांना ही याचिका दाखल करण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.