जळगाव प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे भाजपचे दिग्गज नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी लवकरच आपण मोठी बातमी देणार असल्याची माहिती आज पत्रकारांना दिली आहे. आता ही मोठी बातमी नेमकी कोणती असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे हे लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत असल्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत मोठ्या प्रमाणात उलट-सुलट दावे करण्यात येत असले तरी खुद्द एकनाथराव खडसे यांनी मौन बाळगले आहे. आपला पक्षांतराचा कोणताही विचार नसल्याचे ते वरकरणी सांगत आहेत. तथापि, आता मात्र ते ठाम निर्णयाच्या जवळ असल्याचे संकेत मिळाले आहेत.
कालच खडसे यांची क्लीप व्हायरल झाली असून यात ते लवकरच निर्णय घेणार असल्याचे वक्तव्य करत असल्याचे सर्वांनी ऐकले आहे. यानंतर त्यांनी आज भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थिती लावली. यानंतर जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी या प्रकरणी थेट भाष्य करणे टाळले. तथापि, येत्या तीन-चार दिवसांमध्ये आपण मोठी बातमी देणार असल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत. अर्थात, आता खडसेंची मोठी बातमी कोणती असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.