मुंबई प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ईडीच्या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून यावर पुढील सुनावणी २५ जानेवारी रोजी होणार आहे.
माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची अलीकडेच ईडीने चौकशी केली होती. यानंतर ईडीनं आपलं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं. त्यानुसार एकनाथराव खडसेंना अटकेपासून दिलासा देण्यास ईडीचा विरोध आहे. खडसेंच्यावतीनं वकिलांनी युक्तीवाद केला. याबाबत आज कोर्टात सुनावणी झाल्यानंतर, याप्रकरणाची पुढील सुनावणी २५ जानेवारीला होणार आहे.
एकनाथराव खडसे यांनी आपल्या याचिकेत ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. तसंच या चौकशीची व्हिडिओग्राफी करण्याची मागणी या याचिकेत आहे. शिवाय तपासात सहकार्य करत असल्यानं कोणतीही कठोर कारवाई न करण्याची विनंती खडसेंनी केली आहे. यामुळे आता सोमवारी नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.