जिल्हा परिषदेतील निधी वाटपाबाबत खडसेंची तक्रार

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा परिषदेतील निधी वाटपात असमानता असल्याची तक्रार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांकडे केली आहे.

जळगाव जिल्हा परिषदेतील काही सर्वपक्षीय सदस्यांनी आपसात तब्बल २५ कोटी रूपयांचे कामे वाटून घेतली असून इतर सदस्यांना मात्र तुलनेत कमी निधी प्रदान करण्यात आला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या डॉ. नीलम पाटील यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसेंकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन नाथाभाऊंनी प्रा. डॉ. पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेवून तक्रार केली आहे.

जिल्हा परिषदेतील निधी वाटपाबाबत नेहमीच तक्रार होत असते. ठाराविक सदस्य हे आपापसात समझोता करून आपल्यासाठी वाढीव निधी घेत असून इतरांवर मात्र अन्याय होत असल्याची ओरड कधीपासूनच होत आहे. यात सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटांमधील मातब्बर पदाधिकारी हे इतरांवर अन्याय करत असल्याबाबत अनेकदा आवाज उठविण्यात आला असला तरी यावर कार्यवाही झालेली नाही. यातच अलीकडेच जिल्हा परिषदेतील पहिल्या फळीतील सर्वपक्षाचे सदस्य एकत्र आले आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या तब्बल २५ कोटी रूपयांचे कामांचे वाटप या सदस्यांनी आपसात केले आहे. तर अन्य सदस्यांना केवळ २ ते ३ लाखांचीच कामे मिळाली आहेत.

राष्ट्रवादीच्या सदस्या प्रा. डॉ. नीलम पाटील यांनी याबाबत आवाज उठविला आहे. त्यांनी माजी मंत्री एकनाथ खडसेंसोबत मुंबई गाठून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उपमुख्यमंत्री अजित पवार , ग्रामविकास विभागाच्या सचिवांची भेट घेवून हा प्रकार लक्षात आणून दिला. याची दखल घेत या प्रकाराची आता तातडीने चौकशी केली जाणार आहे.

Protected Content