…हे षडयंत्र पाटील व महाजनांचेच ! १३७ कोटींचा दंड भरणार नाही, अपिलात जाणार ! : एकनाथ खडसे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ”मला काही ना काही करून अडचणीत आणण्याचे अनेक प्रयत्न झाले असून यात यश न आल्याने मंत्री गिरीश महाजन व आमदार चंद्रकांत पाटील यांनी षडयंत्र करून १३७ कोटींची नोटीस पाठवली आहे. मात्र आपण ही रक्कम भरणार नसून अपिलात जाणार आहोत !” असे प्रतिपादन आमदार एकनाथराव खडसे यांनी केले.

या संदर्भातील वृत्त असे की, आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना अवैध गौण खनिज उत्खननात तब्बल १३७ कोटी रूपयांच्या दंडाची नोटीस मिळाल्याने खूप मोठी खळबळ उडाली आहे. स्वत: खडसे हे मुंबईत असल्याने स्थानिक पातळीवर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेता आली नाही. तथापि, आज दुपारून आमदार खडसे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलतांना हा प्रकार राजकीय षडयंत्राचा असल्याची टिका केली.

याप्रसंगी, एकनाथराव खडसे म्हणाले की, तहसीलदारांनी १३७ कोटी रूपयांची नोटीस बजावल्याचे मला आज माहित पडले. मी काही दिवसांपासून बाहेर होते. तथापि, मला अशा स्वरूपाची नोटीस मिळेल हे माहित होते, कारण हा एका राजकीय षडयंत्राचा भाग आहे. याच्या मागे आमदार चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह त्यांचा कंपू आहे. हा कंपू मला सातत्याने अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतो.

एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या विरोधात अनेक कट रचूनही माझे काहीच झाले नाही. अगदी ईडीच्या विरोधात जामीन मिळवणारा मी देशातील एकमेव व्यक्ती आहे. सदर जमीनीतून उत्खनन करण्यात आले असून ते हायवेला पुरवठा करणार्‍या कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यामुळे उत्खननाची जबाबदारी ही परवानाधारकाची आहे. मी महसूलमंत्री राहून चुकल्याने याबाबत मला संपूर्ण माहिती असल्याचे खडसे म्हणाले.

आपण सत्ताधार्‍यांवर अलीकडच्या काळात जोरदार टिका केल्यामुळे हा प्रकार घडला असावा का ? असा प्रश्‍न विचारण्यात आल्यावर, एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, मी राष्ट्रवादीत गेल्यापासून मला छळण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. कदाचीत मी भाजपमध्ये पुन्हा यावे यासाठी हे होत असावे. कारण मी भाजपसाठी आवडता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तर काहीही झाले तरी आपण झुकणार नसल्याचा टोला देखील खडसेंनी मारला. आपण १३७ कोटींचा दंड भरणार नसून अपिलात जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी याप्रसंगी दिली.

दरम्यान, याप्रसंगी आमदार एकनाथराव खडसे यांनी मराठा आरक्षणावरून देखील सत्ताधार्‍यांवर जोरदार टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, आपण सत्तेत आल्यावर मराठा समाजाला आरक्षण देऊ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यांनी आरक्षण दिल्यावर ते न्यायालयात टिकले नाही. आता मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाल्यावर ओबीसींनी देखील आंदोलन केल्याने हा प्रश्‍न चिघळला असून याला सर्वस्वी सत्ताधारीच कारणीभूत असल्याचा आरोप खडसे यांनी केला.

Protected Content