इजिप्तचे माजी राष्ट्रपती मोर्सी यांचा न्यायालयातच मृत्यू

images 1 1

कैरो (वृत्तसंस्था) इजिप्तचे माजी राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी यांचे न्यायालयातच निधन झाले असल्याची माहिती इजिप्तच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिली आहे. त्यांच्यावर झालेल्या हेरगिरीच्या आरोपावर सुनावणी सुरु असताना ६७ वर्षीय मोर्सी अचानक बेशुद्ध झाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे.

 

२०१२ साली इजिप्तमध्ये क्रांती झाल्यानंतर मोर्सी इजिप्तचे राष्ट्रपती झाले होते. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले ते पहिले राष्ट्रपती होते. एका व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी मोर्सी यांना २० वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसेच हमास या दहशतवादी संघटनेसाठी हेरगिरी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असलेले मोर्सी अचानक कोसळले आणि जागीच गतप्राण झाले. ह्रदयविकाराचा झटक्यामुळे मोर्सी यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झाले आहे.

ही तर शिस्तबद्ध हत्या :- मोर्सी यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले नसून शिस्तबद्ध पद्धतीने तुरुंगात त्यांची हत्याच करण्यात आली आहे, असा आरोप मुस्लिम ब्रदरहूड या पक्षाने केला आहे. ‘मोर्सीची तुरुंगात नीट काळजी घेतली गेली नाही. ते आजारी असताना त्यांना औषधे देण्यात आली नाहीत. अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न त्यांना देण्यात आले. यामुळेच त्यांचा मृत्यू ओढवला आहे.’ असा आरोप मोर्सींच्या स्वातंत्र्य आणि न्याय पक्षाकडून करण्यात आला आहे.

Protected Content