‘मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे’ – डॉ. सतीश मस्के

भुसावळ, – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मराठी भाषा गौरव दिन आणि कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस भुसावळ शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महीला महाविद्यालयात ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने कार्यक्रम संपन्न झाला.

सोमवार, दि .२८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता कवी कुसुमाग्रज यांचे ‘मराठी साहित्यातील योगदान व सद्यःस्थिती’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सतीश मस्के यांनी व्यक्त होतांना म्हणाले की, “कुसुमाग्रज हे सामाजिक जाण असलेले साहित्यिक होते. समाजातील ज्वलंत प्रश्न साहित्यातून मांडले गेले पाहिजे. कष्टकरी, शेतकरी, सुशिक्षित, बेरोजगार यांच्या समस्या साहित्यातून मांडल्या गेल्या पाहिजे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन आता विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. जेणेकरून समाजातील विषमतेची दरी नष्ट होण्यास मदत होईल व सामाजिक सलोखा जपला जाईल. मराठी भाषा ही महाराष्ट्राची शान आहे. मराठी भाषा माणसाच्या मनामनात रुजावी, तिचे संवर्धन व्हावे यासाठी सर्वच स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणे गरजेचे आहे आहे.अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य प्रा.वाय.डी.देसले यांनी भूषविले. ‘सर्वच मराठी बांधवांनी मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे.’ असे मत प्रा. देसले यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रा.विनोद भालेराव यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय केला.तृतीय वर्ष कला या वर्गाची विद्यार्थिनी सुषमा केदारे हिने सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन पंडित यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.मनीषा इंगळे प्रा.निलेश गुरुचल, प्रा.डॉ गिरीश कोळी, प्रा.गिरीश सरोदे यांनी सहकार्य केले.

Protected Content