मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा । अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आपल्या तत्परतेने आत्तापर्यंत हजारो कोटी रुपयांच्या बेकायदेशीर मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, ईडीला अद्याप स्वतःचं कार्यालय नव्हतं. त्यांची कार्यालये भाड्याने घेतलेल्या ठिकाणी होती. मात्र, आता त्यांना आर्थिक राजधानी मुंबईत मोठं ऑफीस मिळणार आहे. ईडीला मुंबईतील कार्यालयासाठी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मध्ये 362 कोटी रुपयांचा भूखंड देण्यात आला आहे. सध्या मुंबईत ईडीचे कार्यालय आणि स्टोअर रूम तीन वेगवेगळ्या इमारतींमध्ये आहेत. यापैकी दोन बॅलार्ड इस्टेटमध्ये तर एक कार्यालय वरळी येथे आहे.
ईडीला अर्धा एकरचा भूखंड देण्यात आला आहे. ज्यातून 10,500 स्क्वेअर मीटरवर इमारत बांधली जाऊ शकते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) 10,500 चौरस मीटरसाठी 3.4 लाख रुपये प्रति चौरस मीटर आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या मुंबईत ईडीची कार्यालये असलेल्या तीन इमारतींमध्ये इतर खासगी कंपन्यांचीही कार्यालये आहेत. अशा परिस्थितीत एजन्सीला तिथे येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवणे अवघड जाते. बॅलार्ड इस्टेटमध्ये ईडीची कार्यालये भाड्याने आहेत. मयत ड्रग्ज तस्कर इक्बाल मिर्चीच्या जप्त केलेल्या मालमत्तेत वरळीचे कार्यालय आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ते जप्त केले होते.