मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांची संपत्ती जप्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कारवाया सुरू होत्या. यानंतर आज ईडीने थेट राऊत यांचीच संपत्ती जप्त केल्याची कारवाई केली आहे. ईडीने संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबागमधील मालमत्तात जप्त केल्या आहेत. यामध्ये दादरमधील एक सदनिका आणि अलिबागमधील ८ भूखंडांचा समावेश आहे. गोरेगावमधील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्याआधारे ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे.
पत्राचाळ जमीन प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाले होते. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा आरोप आहे. संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत आणि सुजीत पाटकर यांची पत्नी स्वप्ना पाटकर यांच्या नावाने या जमिनी खरेदी करण्यात आल्या होत्या. स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले, असाही आरोप आहे. गेल्या काही दिवसांपासून ईडी राऊतांवर कारवाई करणार, असे इशारे भाजप नेत्यांकडून दिले जात होते. मात्र, आता ईडीने प्रत्यक्षात संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे.