बुलढाणा जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे ७१ कोटी रुपयांची थकबाकी

बुलढाणा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | वीज बिलाची रक्कम न भरल्याने महावितरणच्या वतीने कायम स्वरुपी वीज पुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांना थकबाकीची रक्कम भरण्यासाठी महावितरणकडून माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख अभय योजना सुरू केली आहे.या योजनेचा लाभ महावितरणच्या अकोला परिमंडळातील २ लाख २१ हजार वीज ग्राहकांना होणार आहे.

 

घरगुती, वाणिज्य श्रेणीतील वीज ग्राहकांसाठी माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख अभय योजना  सुरू केली आहे.योजनेत सहभागी होणार्‍या वीज ग्राहकांचे विलंब शुल्क आणि व्याज या योजनेत माफ होणार आहे. वीज ग्राहकांना फक्त थकबाकीची मुळ रक्कम एकरकमी अथवा सहा हप्त्यात भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.थकबाकीची रक्कम एक रकमी भरल्यास घरगुती ग्राहकांना दहा टक्के तर उच्च दाब वीज ग्राहकांना पाच टक्के सुट मिळणार आहे. महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अकोला परिमंडळात २ लाख २१ हजार ५९३ वीज ग्राहकांकडे १७७.२७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.विलंब शुल्क २ कोटी २२ लाख रुपये आणि व्याजाची रक्कम २१.२१ कोटी रुपये सदर योजनेत माफ होणार आहे.
अकोला जिल्ह्यातील ५९,९९४ वीज ग्राहकांकडे ५७ कोटी ३५ लाख रूपयांची थकबाकी आहे.बुलढाणा जिल्ह्यातील १लाख २ हजार ११६ वीज ग्राहकांकडे ७१.१२ कोटी रुपयांची थकबाकी आहे.वाशिम जिल्ह्यातील ५९,४८३वीज ग्राहकांकडे ४८.८१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. योजनेत सहभागी होण्यार्‍या वीज ग्राहकांचे विलंब शुल्क आणि व्याज माफ होणार आहे.

थकबाकीची रक्कम एकरकमी न भरु शकणार्‍या वीज ग्राहकांना सहा समान हप्त्यांत ही रक्कम भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.सुरूवातीला थकबाकी असलेल्या रकमेतील ३० टक्के रक्कम भरायची आहे.शिल्लक रक्कम हप्त्यात भरता येईल. जर वीज ग्राहक हप्ते भरण्यास असमर्थ ठरल्यास विलंब शुल्क आणि व्याज परत लागू होणार आहे.

Protected Content