ब्रेकींग : मंदाताई खडसे यांना ईडीचे चौकशीसाठी समन्स

मुंबई प्रतिनिधी | भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांना सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने चौकशीसाठी समन्स पाठविले आहे. आधीच्या समन्सप्रसंगी सौ. खडसे यांनी मुदत मागून घेतल्यानंतर त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे.

एकनाथराव खडसे हे महसूलमंत्री असतांना त्यांनी शासकीय नियमांचे उल्लंघन करून भोसरी येथील एक भूखंड आपली पत्नी व जावयाला मिळवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. यातून त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. अलीकडच्या काळात याची ईडीमार्फत चौकशी करण्यात आली आहे. याआधी एकनाथराव खडसे यांची दोनदा ईडीने चौकशी केली आहे. दुसर्‍या चौकशीच्या दरम्यान खडसे यांनी पूर्ण सहकार्य करत हव्या त्या वेळेस गरज पडल्यास चौकशीला उपस्थित राहण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी हे याच प्रकरणात ५ जुलै पासून ईडीच्या अटकेत आहेत.

भोसरी येथील भूखंड हा गिरीश दयाराम चौधरी आणि मंदाताई एकनाथराव खडसे यांनी संयुक्तरित्या खरेदी केला होता. यामुळे मंदाताईंना याआधी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. तेव्हा त्यांनी चौकशीआधी वेळ मागून घेतला होता. ईडीने ही मागणी मान्य केल्याने त्यांची चौकशी ही पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, यानंतर आता ईडीने त्यांना पुन्हा समन्स बजावले असून उद्या अर्थात १८ ऑगस्ट रोजी ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगितले आहे. ईडीच्या सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. तर लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीने खडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

भोसरी गैरव्यवहार प्रकरणी खडसे कुटुंब गोत्यात आले असतांनाच गेल्या आठवड्यात त्यांच्याशीच संबंधीत असणार्‍या मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाची माहिती मिळवण्यासाठी ईडीने जिल्हा बँकेला नोटीस बजावली आहे. या बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे असल्याने राजकीय आणि सहकार क्षेत्रात यामुळे खळबळ उडालेली आहे. यातच आता मंदाताई खडसे यांना ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावल्याने यात काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content