अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने विधिवत मंत्रोपचारांच्या मंगल सुरात पर्यावरणपूरक होळी पूजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते ईश्वर अर्जुन धनगर (जिभाऊ कंखरे) सपत्नीक पूजेचे मानकरी होते.
ईश्वर धनगर यांनी होळी पूजनापूर्वी श्री मंगळग्रह मंदिरात श्री सत्यनारायण महापूजेसह अन्य पूजाही केल्या. जवळपास अडीच ते तीन तास एकूण पूजा-विधी चालले. पूजेच्या निमित्ताने उपस्थित सर्व भाविकांना तीर्थप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी होळीसह श्री मंगळग्रह मंदिर परिसर आकर्षक रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांच्यासह सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. होळी पूजनानंतर धनगर दाम्पत्याच्या हस्ते सायंकाळची महाआरती झाली. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना नैसर्गिक रंग लावून होलिकोत्सवाचा आनंद घेतला. मंदिराचे पुरोहित जयेंद्र वैद्य, तुषार दीक्षित, गणेश जोशी, मंदार कुलकर्णी व अक्षय जोशी यांनी पौरोहित्य केले.