शिवसैनिकांनी प्रतिज्ञापत्रे देतांना वापरली बनावट ओळखपत्रे व शिक्के !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेला धक्का दिला असतांनाच मुंबई क्राईम ब्रांचने शिवसैनिकांच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये बनावट ओळखपत्रे आणि शिक्क्यांचा वापर झाल्यासंदर्भात कारवाई केली आहे.

आज केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार पर्यंत दोन्ही गटांनी आपापल्या निशाणीचे प्रस्ताव सादर करायचे आहेत. यावर निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. दरम्यान, आजच्या निर्णयामुळे शिवसेनेला धक्का बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या पाठोपाठ मुंबई क्राईम ब्रांचने शहरात ठिकठिकाणी छापेमारी केली असून यात उध्दव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांवर बनावट शिक्के आणि ओळखपत्रांचा वापर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या संदर्भातील पुरावे या छापेमारीत सापडले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे उध्दव ठाकरे यांनी सादर केलेली प्रतीज्ञापत्रे रद्द करण्याची शक्यता देखील यातून बळावली आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या पाठोपाठ मुंबई पोलिसांच्या कारवाईमुळे उध्दव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Protected Content