गौण खनिजाची चोरी अन् वरून डंपर बदलाचा झोल : अखेर गुन्हा दाखल

बोदवड प्रतिनिधी | दुसर्‍याच पावतीच्या नावावर अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडल्यानंतर त्याच्या जागी दुसरेच डंपर उभा करण्यचा प्रकार उघड झाला असून संबंधीत डंपरचा मालक आणि चालकाच्या विरूध्द बोदवड स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या संदर्भातील माहिती अशी की, बोदवड येथील तलाठी मंगेश वासुदेव पारिसे यांनी बोदवड पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, १२ जानेवारी रोजी रात्री बोदवडचे तहसीलदार योगेश्‍वर टोपे हे शेलवडचे कोतवाल गजानन अहिरे, तलाठी दिपा नांदुरकर यांच्यासह गस्तीवर असतांना त्यांना एमएच १९ वाय-४४६४ या क्रमांकाचे वाहन वाळू वाहतूक करतांना दिसले होते. या संदर्भात विचारणा केली असता या वाहनावर सुरेश भोई ( रा. भोईवाडा, भुसावळ) हा ड्रायव्हर असून ते शरद भागवत पाटील (रा. जळगाव) याच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात आले. चालकाने महसूलच्या पथकाला गौण खनिजाची पावती सादर केली. संबंधीत पावती वैध असली तरी जीपीएस मापनानुसार हे वाहन त्या रस्त्यावरून गेलेले दिसले नाही. यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार हे डंपर तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले.

 

यानंतर २३ जानेवारी रोजी उपप्रादेशीक परिवहन खात्याच्या कार्यालयातून सुनील गुरव हे संबंधीत डंपरच्या तपासणीसाठी आले. तेव्हा त्यांना एमएच १९ वाय-४४६४ या क्रमांकाच्या डंपरचा चेसीस क्रमांक एफएनई६५६८१२ असल्याचे दिसून आले होते. त्यांनी या प्रकारची नोंद देखील घेतली होती. यानंतर दुसर्‍या दिवशी या वाहनाचे वजन आणि इतर चाचण्या करण्यासाठी ते आले असता या वाहनाचा क्रमांक एमएच १९ वाय-४४६४ असा तर चेसीस क्रमांक हा एमबी१जी३डीवायसी३सीआरडीएच१४३२ असा आढळून आला. तसेच याच्या मागील बाजूस देखील बदल झाल्याचे दिसून आले. याचाच अर्थ असा की, महसूल खात्याच्या पथकाने जप्त केलेल्या डंपरच्या ठिकाणी दुसरे डंपर आणून त्याच्यावर आधीच्या वाहनाचा क्रमांक लावण्यात आला होता. म्हणजे एका डंपरने केलेला गुन्हा झाकण्यासाठी दुसरे डंपर त्या ठिकाणी लावण्यात आल्याचे निदर्शनास आले.

 

या अनुषंगाने आज बोदवड पोलीस स्थानकात डंपर मालक शरद भागवत पाटील (रा. जळगाव) आणि चालक सुरेश भोई (रा. भोईवाडा, भुसावळ) या दोघांच्या विरोधात भादंवि कलम ३७९,  ४२०, ४६५, ४६८, ४७१, १२०-बी आणि १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या डंपरच्या झोलमागे जळगावमधील काही बड्या धेंडांचा हात असल्याची माहिती समोर आली असून आता पोलीस तपासातून सत्य समोर यावे ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content