नागपूर (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अनीस अहमद यांनी उमेदवारीवरून आपल्याच पक्षावर टीकास्त्र सोडले आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याक, आदिवासी आणि दलित समाजाला डावललं असल्याची टीका अनिस अहमद यांनी केली आहे. वाढणाऱ्या एमआयएम पक्षाला वेळीच रोखायचे असेल तर याचा नक्कीच विचार करावा लागेल, असे सांगताना यावेळी पक्षाने एकतर्फी निर्णय घेत तिकीटवाटप केल्याचा आरोपही अहमद यांनी केला.
औरंगाबादमध्ये एमआयएमला चांगेल यश मिळाले आहे. हा पक्ष राज्यात वाढताना दिसत आहे. शिवाय औरंगाबादमध्ये अब्दुल सत्तार यांच्यासारख्या नेत्यांनीही पक्षाविरोधात बंड केले आहे. अशा स्थितीत काँग्रेस पक्षाने योग्य विचार करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. सर्व समाजाला सोबत घेऊन वाटचाल करा, असे पक्षश्रेष्ठींचे आदेश आहेत. असे असतानाही यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी अल्पसंख्याक, आदिवासी आणि दलितांना विश्वासात न घेताच तिकीट वाटप केले आहे, अशा शब्दांत अहमद यांनी आपली नाराजी उघड केली आहे.
मुस्लिम समाजाची मते ही आपल्यासाठीच राखून ठेवलेली मत आहेत, असे काँग्रेसने समजू नये, असेही अहमद यावेळी म्हणाले. मु्स्लिम समाजाला गृहित धरणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. या बरोबरच लोकसभा निवडणुकीची उमेदवारी ठरवताना काँग्रेसने आदिवासी आणि दलित समाजालाही बाजूला सारले आहे. शिवाय जे खरे दलित नेते आहेत, त्यांनाच पक्षाने डावलले आहे, असेही अहमद म्हणाले.