सरकारच्या दुर्लक्षामुळे १०८ ॲम्बुलन्स १ जुलैपासून चालक संपावर !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आपल्या प्रलंबित आणि विविध मागण्यांकडे सरकार तसेच सेवा पुरवठादार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, राज्यातील १०८ रुग्णवाहिका चालकांनी येत्या १ जुलैपासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती आज शनिवारी २८ जून सकाळी ११ वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णवाहिका चालकांनी दिली.

जळगाव येथील १०८ रुग्णवाहिका चालक युनियनने दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून हे चालक अत्यंत महत्त्वाच्या आरोग्य सेवा पुरवत आहेत. मात्र, त्यांना मिळणारे अल्प वेतन, रुग्णवाहिकांची दयनीय अवस्था आणि सुरक्षिततेचा अभाव यांसारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात चालकांनी यापूर्वीही अनेकवेळा निवेदने दिली असून, आंदोलनेही केली आहेत. परंतु, तरीही त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने चालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

“जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे कामबंद आंदोलन सुरूच राहील,” असा स्पष्ट इशारा युनियनच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे राज्याच्या आरोग्य सेवेवर, विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तातडीच्या वैद्यकीय सेवा मिळण्यात अडचण निर्माण होऊ शकते. सरकारने आणि संबंधित सेवा पुरवठादारांनी चालकांच्या मागण्यांवर तातडीने विचार करून योग्य तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.