जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रमजानच्या पवित्र महिन्यात जकातचे न्याय्य वितरण आणि उपासनेचे व्यावहारिक प्रकटीकरण याविषयी इकरा महाविद्यालयाचे जनाब शेख सोहेल अमीर साहब यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित इफ्तार पार्टीत प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते.
या प्रसंगी जनाब शेख सोहेल अमीर साहब यांनी वैद्यकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनी सेवाभावातून समाजासमोर आदर्श निर्माण करावा, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास डॉ. केतकीताई पाटील, डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. प्रेमचंद पंडित, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, डॉ. माया आर्विकर, डॉ. हर्षल बोरोले, आयुर्वेद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे अधिष्ठाता डॉ. गुणवंतराव सरोदे, डॉ. डी. बी. पाटील, प्राचार्य डॉ. आर. के. मिश्रा, डॉ. जयवंत नागुलकर, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या विशाखा गणविर, तसेच प्रा. सतीश सावके आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास एमबीबीएस, बीएचएमएस, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि इतर वैद्यकीय शाखांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तृत लॉनमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इफ्तारनंतर लगेचच मगरीबची नमाज अदा करण्यात आली आणि त्यानंतर भोजन व्यवस्था करण्यात आली.
सोहेल अमीर शेख यांनी इस्लाम धर्माच्या मूलतत्त्वांवर आणि रमजानच्या उद्देशांवर सविस्तर मार्गदर्शन केले. इस्लाम हा बंधुता आणि प्रेम शिकवतो, असे सांगत त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे उत्तम आयोजनाबद्दल अभिनंदन केले. डॉ. एम. डी. अब्दुल्लाह यांच्या मार्गदर्शनानुसार, या कार्यक्रमात मुस्लिम विद्यार्थ्यांसह इतर धर्मीय विद्यार्थी आणि शिक्षकांनीही उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी मुस्लिम विद्यार्थ्यांना रमजान व आगामी ईदच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला आणि उपस्थित सर्वांनी त्याचा आनंद लुटला.