कोरोना रूग्णांची सेवा करुन कोरोना योध्दांनी सामाजिक दातृत्वाचे दर्शन घडविले – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । संपूर्ण जिल्ह्यात थैमान घालणा-या कोरोना विषाणूपासून नागरीकांना दूर ठेवणे, दुर्देवाने कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची सेवा करून त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी कोरोना योध्दांनी अहोरात्र झटून आपल्या सामाजिक दातृत्वाच्या भावनेचे दर्शन घडविले आहे. असे प्रतिपादन राज्याचे  सार्वजनिक पाणीपुरवठा व स्‍वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

येथील कांताई सभागृहात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या शाॅर्ट फिल्मचे प्रसारण व कोरोना योध्दांच्या सत्काराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एन. एस. चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डाॅ. मारोती पोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. जमादार, डॉ. समाधान वाघ, माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटोडे, जिल्ह्यातील सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद, महानगर पालिकेतील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच कोरोना काळात उत्कृष्ट काम करणा-या संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, कोरोना आजार तसा संपूर्ण जगासाठी नवीनच असल्याने सुरवातीला त्याच्यावर ठोस उपाय नव्हता. नवनवीन अनुभवातून औषधोपचार करून कोरोनाला आटोक्यात आणणे हे आरोग्य विभागासाठी माठे दिव्य होते. अशाही परिस्थितीत या विभागाने हार न मानता रुग्णांच्या पाठीशी खंबीरपणे राहून रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना खचू न देण्याचे मोठे काम केले आहे. आरोग्य यंत्रणेतील डाॅक्टर, अधिकारी, कर्मचारी यांची कामगीरी देवदुतापेक्षा नक्कीच कमी नसल्याचे गौरवोद्गारही त्यांनी व्यक्त केले.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, मध्यंतरी परराज्यातील मजुरांचे मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यातून विविध मार्गांनी स्थलांतर झाल्यामुळेही कोरोना वाढला. तथापि, काही सामाजिक संस्थांनी त्यावेळी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून त्या मजुरांची अन्न पाण्याची सोय करून राज्यात आणि देशात जिल्ह्याची प्रतिमा उंचावली. कोरोना योद्ध्यांचा आजचा सन्मान हा एक प्रातिनिधीक स्वरुपातील आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अजून कमी झाल्यावर मोठ्या स्वरूपात कोरोना योद्ध्यांचा सत्कार आणि सन्मान करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत आपल्या मनोगतात कोरोना योध्दांच्याप्रती आपल्या कृतज्ञ भावना व्यक्त करतांना म्हणाले की, आज धनोत्रयोदशी म्हणजे आयुर्वेदातील भगवान धनवंतरी यांचा दिवस. आणि या दिवशी आरोग्यदुत म्हणून काम करणाऱ्या कोरोना योध्दांचा सन्मान म्हणजे एक दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. अनेक आरोग्य तज्ञांकडून व्यक्त होत असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात बोलतांना जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले की, जिल्हा प्रसासन आणि आरोग्य यंत्रणा आता अधिक सक्षमपणे सज्ज असल्याने जिल्हावासियांनी घाबरून जावू नये. मात्र प्रत्येक नागरिकाने खबरदारी कटाक्षाने पाळलीच पाहिजे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांप्रती गौरोद्गार काढले. तसेच जिल्हावासियांनी आतापर्यंत ज्याप्रमाणे प्रशासनास सहकार्य करून आपआपल्या परिने जे योगदान दिलेत ते भविष्यातही लाभेल असा आशावाद व्यक्त केला. यावेळी आरोग्य यंत्रणेतील डाॅक्टर, आरोग्यसेविका, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचा पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/362729654842312/

Protected Content