डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात तरुणावर स्पायनल फ्यूजनची क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तब्बल ३५ फूट उंचीवरुन पडलेल्या तरुणाला मणक्याला फ्रॅक्चर झाल्याने त्याच्यावर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ञ स्पाईन सर्जन यांच्या अथक प्रयत्नाने स्पायनल फ्यूजनची क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील अस्थिरोग विभागात हाडांचे दुखणे, मणक्याच्या विकारावर उपचार आणि शस्त्रक्रिया सुप्रसिद्ध स्पाईन सर्जन डॉ.दिपक अग्रवाल करतात. त्यांची ख्याती पंचक्रोशीत पसरली असून दूरदूरुन रुग्ण येथे उपचारासाठी येतात. अशातच जामनेर तालुक्यातील एका तरुण रुग्णाला घेऊन त्याचे नातेवाईक आले, झाडाचा पाला तोडण्यासाठी तरुण झाडावर चढला असता अचानक तोल गेल्याने तो ३५ फूटावरुन खाली कोसळला असे सांगत जामनेर येथील फिजीओथेरपीस्ट डॉ.दिनेश गांधी यांनी तात्पुरते उपचार करत तातडीने रुग्णाला डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यावेळी रुग्णाला दोन्ही पायांनी चालता येत नव्हते तसेच लघवी आणि शौचावरील नियंत्रणही सुटले होते. यावेळी स्पाईन सर्जन डॉ.अग्रवाल यांनी रुग्णास एक्स रे आणि मणक्याचा एमआरआय करण्यास सुचविले. रिपोर्टवरुन रुग्णाच्या मणक्याला एल १ वर्टिब्रल फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले असता स्पायनल फ्यूजन शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले.

नातेवाईकांच्या संमतीने तात्काळ रुग्णावर डॉ.दिपक अग्रवाल यांनी शस्त्रक्रिया केली असून त्यांना रेसिडेंट डॉ.परिक्षीत पाटील, भुलतज्ञ यांचे सहकार्य लाभले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया पार पडली, काही दिवसांनी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आले. तब्बल तीन महिन्यानंतर रुग्ण आज फॉलोअपसाठी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात आला होता, यावेळी तो त्याच्या पायांवर व्यवस्थीत चालू शकत होता तसेच लघवी आणि शौचावरही त्याचे नियंत्रण कायम झाल्याने रुग्णाने हात जोडून आभार मानले.

मणक्याच्या शस्त्रक्रियेमुळे जगण्याचा आनंद परत

तरुणवयातच मणक्याचे फ्रॅक्चर होण्याची घटना रुग्णाच्याबाबतीत घडली. त्यामुळे त्याच्या दोन्ही पायातील शक्ती कमी झाली होती, लघवी व शौचावरील नियंत्रणही सुटले होते. परिणामी आत्मविश्वासही कमी झाला होता. मात्र आपण येथे त्याची सर्जरी केली आणि सर्जरीनंतर काही कालावधीनंतर तो पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला आणि ढासळलेला आत्मविश्वास परत आल्याने त्याला जगण्याचा आनंद पुन्हा प्राप्त करुन देण्यात यश आले.

 

Protected Content