जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पेंटिंग काम करून सामान्यांच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या ६५ वर्षीय वृद्ध पेंटरच्या आयुष्याचा बेरंग होण्याची भीती होती, परंतु डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे त्यांचे जीवन पुन्हा उमेदीने भरले आहे.

सुभाष कानडे (वय ६५) हे पेंटिंग व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. एका इमारतीचे पेंटींग काम करत असतांना अचानक ते खाली पडले. या दुर्घटनेत त्यांचा मणका आणि मज्जासंस्था गंभीररीत्या दुखावली गेली, ज्यामुळे त्यांच्या हातापायाची ताकद पूर्णपणे नाहीशी झाली होती. या अपघातानंतर त्यांना भविष्यातील आयुष्याची आणि कुटुंबाच्या उपजीविकेची मोठी चिंता होती.
सुभाष कानडे यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी तपासणी केली असता, त्यांच्या मणक्याच्या सी-७ भागात गंभीर समस्या (कॉर्ड कन्फ्युजन) असल्याचे निदान झाले. त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराचाही त्रास असल्याने शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची होती. डॉ. शिवाजी सादुलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. विपूल राठोड यांच्या कौशल्यपूर्ण नेतृत्वाखाली तब्बल पाच तास शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान सी-४, सी-५, सी-६, डी-१ आणि डी-२ भागांचे फिक्सेशन तसेच सी-७ लॅमिनोटोमी करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी भूलतज्ज्ञ डॉ. सतीश आणि अन्य सहायक डॉक्टरांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर फक्त एका आठवड्यात सुभाष कानडे यांची हातापायाची ताकद पुन्हा मिळू लागली. यशस्वी उपचारांमुळे सुभाष कानडे यांच्या आयुष्याला पुन्हा उमेदीचा रंग मिळाला आहे. आता ते पुन्हा आपल्या पेंटिंगच्या कामाला लागले आहेत. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञांची कामगिरी विशेषतः कौतुकास्पद ठरली आहे.
सुभाष कानडे यांनी या उपचारांनंतर व्यक्त केलेली कृतज्ञता त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होती. त्यांनी सांगितले की, “डॉक्टरांनी मला नवसंजीवनी दिली आहे. आता मी पुन्हा काम सुरू करू शकतो, याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही.”