जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील समाजिकशास्त्रे प्रशाळेत डॉ. आंबेडकर विचारधारा विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा. डॉ. विजय घोरपडे यांना पहिला राज्यस्तरीय महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर विचारधारा, प्रचारक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजय फुलारी, प्र कुलगुरू प्रा. वाल्मिक सरोदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या समतेचे युवा पर्व भीमोत्सवात महात्मा फुले आणि डॉ.आंबेडकर थॉटस या विषयातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा. डॉ.विजय घोरपडे यांना अत्यंत मानाचा व प्रतिष्ठित समजला जाणारा ‘पहिला राज्यस्तरीय महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर विचारधारा, प्रचारक पुरस्कार’ महोत्सवाचे उदघाटक, विचारवंत प्रा. दिलीप चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
स्मृति चिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून यावेळी विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक प्रा. डॉ. कैलास अंभुरे, डॉ. प्रकाश इंगळे, सिददोधन मोरे, अनुप तायडे या मान्यवारांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा.डॉ.विजय घोरपडे हे सध्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे समाजिकशास्त्रे प्रशाळेत डॉ. आंबेडकर विचारधारा विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा, प्रचारक पुरस्कार’ मिळाल्या बद्दल सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातिल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.