जळगाव प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान संचलीत डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात आषाढी एकादशी दिंडीसह हरिनामाच्या गजरात उत्साहात साजरी करण्यात आली.
आषाढी एकादशीला श्रीहरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणारी वारकऱ्यांची पायी वारी कोरोना काळाच्या पार्श्वभूमीवर बंद आहेत.म्हणूनच चिमुकल्यांची पायी वारी ,दिंडी पुस्तकरूपी पांडुरंगाच्या दर्शनासाठी काढण्यात आली. विद्यार्थ्यांची वारी पुस्तकांच्या दारी या दिंडीची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय योगिता शिंपी यांच्या हस्ते पालखीत असलेल्या विठ्ठल रुक्मिणीचे व पुस्तकांचे पूजन करून करण्यात आली. पुस्तक वाचनाच्या आवडीने पुस्तकांच्या ओढीने पुस्तकांकडे जाणारी विद्यार्थ्यांच्या दिंडी दरम्यान हरिनामाच्या गजरात साजरी करण्यात आली.
१.आम्हा सर्वांचे हेच साकडे पुस्तकरूपी पांडुरंगा ने आम्हा प्रकाशाकडे.२.आषाढीला हरिनामाचा गजर पुस्तक वाचनाने आला ज्ञानाला बहर.३.वाचन करण्यासाठी जाऊ पुस्तकांच्या दारी…ज्ञानदाता विठ्ठलच आहे ,सफल होईल आषाढीची वारी.४.विद्यार्थ्यांची वारी पुस्तकांच्या दारी पांडुरंग हरी , वासुदेव हरी. अशा घोषणाही देण्यात आल्या. त्याच बरोबर दिंडीत सहभागी शिक्षकांनी पावली ,फुगडी व वारकरी नृत्यही केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी ऑनलाइन प्रसार माध्यमांच्या सहाय्याने दिंडीत पालखी सोहळ्यात सहभागी होऊन आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाची मूळ कल्पना व मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ.योगिता शिंपी यांचे होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री. गजानन कोळी व सौ. योगिता राणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच कर्मचारी यांनी परिश्रम व सहकार्य केले.