मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येत असून, यानिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून दि. 06 एप्रिल ते दि. 16 एप्रिल दरम्यान राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम सुरू आहे.
त्याचबरोबर उद्या दि. 14 एप्रिल रोजी राज्य शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 12 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री, पद्मविभूषण खा. शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार राहुल नार्वेक यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन व अन्य उपक्रम संपन्न होणार आहे.
यामध्ये मार्जिन मनी लाभार्थींना धनादेश वितरण, परदेश शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा गौरव, यूपीएससी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आदी कार्यक्रमांसह समान संधी केंद्रांचे प्रातिनिधिक उद्घाटन संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सकाळी दहा वा. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. भारत देशाला संवैधानिक दिशा देणाऱ्या प्रज्ञासूर्य, ज्ञानाचा अखंड तेजपुंज, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक योगदानाचा परिपाक सामाजिक न्याय विभाग असून, आदरणीय बाबासाहेबांनी पाहिलेले व्यापक व सर्वसमावेशक सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करणे हेच आमचे ध्येय असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
कोविड निर्बंधांच्या दोन वर्षांच्या काळानंतर प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती व्यापक स्वरूपात व सार्वजनिक रित्या साजरी होत असून, सन्मानाने जगण्यासह, समानता व न्यायाचा समान अधिकार देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र नमन करत सर्व जनतेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तसेच मुंबई येथे होत असलेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाची जय्यत तयारी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आली असून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहनही विभागाचे सचिव सुमंत भांगे आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे, बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनीही केले आहे.