Home Cities चोपडा डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी

डॉ. चंद्रकांत बारेला यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी

0
19


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी डॉ. चंद्रकांत बारेला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राज्यस्तरीय प्रवक्त्यांच्या नव्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला असून, पक्षाची भूमिका माध्यमांसमोर प्रभावीपणे मांडण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

डॉ. चंद्रकांत बारेला हे पक्षाच्या आदिवासी सेलचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आदिवासी समाज, ग्रामीण भागातील नागरिक, युवक तसेच वंचित घटकांच्या विविध प्रश्नांवर ते सातत्याने काम करत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील पार्श्वभूमीसोबतच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या डॉ. बारेला यांनी जनतेच्या प्रश्नांना सातत्याने आवाज देण्याचे काम केले आहे.

प्रवक्तेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डॉ. बारेला यांनी ही नियुक्ती केवळ पद नसून जनतेचा आवाज व्यापक पातळीवर मांडण्याची संधी असल्याचे म्हटले. पक्षाची विचारधारा आणि भूमिका राज्यातील विविध व्यासपीठांवर ठामपणे मांडण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेषतः आदिवासी, शेतकरी, युवक, महिला आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. बारेला यांनी स्पष्ट केले. सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये, लोकशाही, रोजगार, शिक्षण, आरोग्य तसेच शेतकरी आणि आदिवासी समाजाशी संबंधित प्रश्न पक्षाच्या माध्यमातून प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.

डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या राज्यस्तरीय मीडिया आणि जनसंपर्काच्या कामाला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound