चोपडा, प्रतिनिधी | येथील तालुका वाचनालय नगर वाचन मंदिराच्या सभासदांपैकी दोघांना माजी उपनगराध्यक्ष स्व.नानासाहेब रमेश वसंतराव देशमुख ‘उत्तम वाचक’ पुरस्काराने दि.१० रोजी होणाऱ्या ‘खान्देशरत्न बहिणाबाई मराठी साहित्य संमेलन’ उद्घाटन सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष आशिष अरुणलाल गुजराथी यांनी दिली आहे.
या पुरस्कारासाठी वाचनालयाचे उपाध्यक्ष प्रा.एस.टी.कुलकर्णी, कार्यवाह गोविंद गुजराथी व डॉ.परेश टिल्लू यांच्या समितीने सर्वंकष तपासणी करुन वाचनालयाच्या सुमारे १३०० सभासदांमधून निवड केली. त्यामध्ये २०१७-१८ या वर्षासाठी निवृत्त तहसीलदार प्रभाकर सोनार यांची तर दि.२०१८-१९ साठी माजी नगरसेवक डॉ.मनोहर अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे. या उत्तम वाचक पुरस्कारार्थींना रोख रक्कम, सन्मानपत्र व स्मृती चिन्ह देवून मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात येणार आहे.
शहरातील सुंदरगढी भागातील नगरसेवक हितेंद्र देशमुख यांनी त्यांचे पिताश्री माजी उपनगराध्यक्ष स्व.नानासाहेब रमेश वसंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ नगर वाचन मंदिराला २५ हजार रुपये देणगी दिली आहे. त्या देणगीच्या व्याजाची रक्कम ‘उत्तम वाचक पुरस्कार’ प्राप्त व्यक्तीला देण्यात येणार आहे. प्रथमच दोन वर्षांसाठी वेगवेगळे दोन वाचक या पुरस्काराने सन्मानित होणार आहेत. वाचन संस्कृती निर्माण होवून सद्यस्थितीत युवकांत वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून हा पुरस्कार सुरु केला गेला असल्याचे कार्यवाह गोविंद गुजराथी यांनी सांगितले आहे. उत्तम वाचक श्री.सोनार व डॉ.अग्रवाल यांचे वाचनालयाचे अध्यक्ष आशिष गुजराथी, पीपल्स बॅकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.