डॉ. ए. बी. चौधरी यांच्याकडे प्रभारी कुलसचिवपदाचा कार्यभार !

जळगाव प्रतिनिधी | डॉ. एस. आर. भादलीकर यांनी प्रभारी कुलसचिवपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी डॉ. ए. बी. चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली असून आजच त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला आहे.

याबाबत वृत्त असे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठातील प्र कुलसचिव डॉ एस आर भादलीकर यांनी विद्यापीठात काम करणार्‍या कर्मचार्‍यांची गोपनिय माहिती पुण्यातील उच्च शिक्षण संचालक कार्यालयात तोंडी मागणी केल्यावरून माहिती पाठविली. यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याने कर्मचारी कृती समितीने यावर तीव्र आक्षेप घेतला. याबाबत विद्यापीठातील सर्व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी दोन दिवस आंदोलन केले. कालच्या आंदोलनानंतर प्रभारी कुलगुरू ई. वायूनंदन यांनी या प्रकरणी कार्यवाहीचे आश्‍वासन दिले. या अनुषंगाने आज प्रभारी कुलसचिव डॉ. एस. आर. भादलीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

प्रभारी कुलसचिव म्हणून नियुक्त झालेले प्रा.ए.बी.चौधरी हे १९९९ पासून विद्यापीठाच्या जैवशास्त्र प्रशाळेत कार्यरत आहेत. यापूर्वी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी दीड वर्ष काम पाहिले आहे. यापुर्वी त्यांनी तीन वेळा प्रभारी कुलसचिव म्हणून काम केले आहे. व्यवस्थापन परिषद सदस्यपदी देखील त्यांनी काम केले आहे. जैवशास्त्र प्रशाळेच्या सुक्ष्मजीवशारू
विभागात ते विभाग प्रमुख म्हणून राहीले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ विद्यार्थ्यांन पीएच.डी. पूर्ण केली असून पाच विद्यार्थ्यांनी प्रबंध सादर केले आहेत.

डॉ. भादलीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आजच त्यांच्या जागेवर डॉ. ए. बी. चौधरी यांना प्रभारी कुलसचिव पदावर नियुक्त करण्यात आले. त्यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला. प्रभारी कुलगुरू ई. वायूनंदन यांच्यासह अन्य अधिकारी आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या कृती समितीने डॉ. चौधरी यांचे स्वागत केले.

Protected Content