नरेंद्र गिरी महाराज यांचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ वृत्तसंस्था | प्रयागराज येथील अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांची संशयास्पद मृत्यू झाला असून अल्लापूर येथील बाघंबरी या ठिकाणी गळफास लावलेल्या स्थितीत नरेंद्र गिरी आढळले आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, महंत नरेंद्र गिरी यांचा मठामध्येच मृत्यू झाला आहे. मठातील लोकांना त्यांची खोली आतून बंद असल्याची आढळली, त्यानंतर दार उघडले असता नरेंद्र गिरी यांचा मृतदेह खांबाला लटकलेला आढळला. दरम्यान, नरेंद्र गिरी यांच्या निधनाच्या वृत्ताने अयोध्येत शोककळा पसरली आहे. सपा नेते अखिलेश यादव यांनीही नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केलं आहे. दरम्यान नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूची माहिती पसरताच घटनास्थळी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

महंत नरेंद्र गिरी बर्‍याच दिवसांपासून तणावाखाली होते, अशी माहिती मिळत आहे. नरेंद्र गिरी यांचे त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याशी अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यांनी आनंद गिरींना मठातून बाहेर केले होते. पण, त्यानंतर आनंद गिरी यांनी माफी मागितल्यानंतर वाद मिटला होता. पण, दोघांमध्ये काही कारणावरुन वाद सुरू होता, अशीही माहिती मिळत आहे. यातच आज त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Protected Content