बॉलिवुडची बदनामी करू नका : अक्षयकुमार

मुंबई । सध्या ड्रग्ज प्रकरणावरून हिंदी चित्रपटसृष्टीबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला असतांना सुपरस्टार अक्षय कुमारने हा प्रकार अस्तित्वात असला तरी यात सर्वांना दोषी धरू नका असे सांगून बॉलीवुडला बदनाम करू नका असे आवाहन केले आहे.

अभिनेता अक्षय कुमार याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत सुशांत आत्महत्या, बॉलीवूड, ड्रग्ज आणि प्रसार माध्यमे याबाबत भाष्य केले आहे. यात त्याने म्हटले आहे की, सुशांतच्या आकस्मिक निधनापासून बॉलीवूडमधील अनेक मुद्दे समोर आले आहेत. त्यामुळे तुमच्या इतक्याच आम्हालाही वेदना झाल्या. उघड झालेल्या गोष्टीमुळे स्वतःच्या समुदयामध्ये जबरदस्तीने डोकावावे लागले. चित्रपटसृष्टीतील अशा अनेक त्रुटी लक्षात घेण्यास भाग पाडले आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग्जची समस्या अस्तित्वात नाही हे कसे खोटे मी खोटे बोलु अशी खंत व्यक्त करत प्रत्येक उद्योगात आणि प्रत्येक व्यवसायात अशा गोष्टी घडत असतात. परंतु प्रत्येक व्यवसायातील प्रत्येक व्यक्ती यात सामील आहे, असे होऊ शकत नाही.

त्याने पुढे म्हटले आहे की, मला खात्री आहे की न्यायालय यासंबंधी जे काही तपास आणि कार्यवाही करेल ते पूर्णपणे योग्य असेल. मला हे देखील माहित आहे की सिनेउद्योगातील प्रत्येक व्यक्ती तपासात पूर्ण सहकार्य करेल.
मात्र, मी हात जोडून विनंती करतो की प्रत्येकाकडे संशयाने पाहु नका. बॉलीवूडमधील प्रत्येकाकडे संशयाने पाहणे हे बरोबर नाही. हे चुकीचे आहे. असे मत त्याने व्यक्त केले.

दरम्यान, त्याने मीडियाबाबतही भाष्य केले आहे. तो म्हणाला की, जर प्रसार माध्यमांनी योग्य वेळी योग्य प्रश्‍न उपस्थित केले नाहीत तर बर्‍याच लोकांना न्याय मिळणार नाही. मी माध्यमांना मनापासून विनंती करू इच्छितो की त्यांनी आपले कार्य करणे आणि दुसर्‍यांच्या न्यायासाठी लढणे चालू ठेवणे आवश्यक आहे. परंतु, कृपया थोडीशी संवेदनशीलता बाळगावी कारण एखाद्या नकारात्मक वृत्तामुळे व्यक्तीची अनेक वर्षे केलेली मेहनत आणि प्रतिमा नष्ट होईल. अशी विनंतीदेखील अक्षयने या व्हिडीओत केली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.