जळगाव (प्रतिनिधी) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अस्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच ओरड होत असते. परंतू रुग्ण उपचार घेत असलेल्या वार्डात मोकाट कुत्रा फिरत असल्याचा धक्कादायक फोटो समोर आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, असा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
या संदर्भात अधिक असे की, जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेच्या बाबतीत नेहमी रुग्णांकडून तक्रारी समोर येत असतात. बऱ्याचदा यावरून कर्मचाऱ्यांसोबत वाद देखील होतात. परंतू काल दुपारी रुग्णालयातील वार्ड क्रमांक ७ मध्ये एक कुत्रा मोकाटपणे फिरत असल्याचा फोटो समोर आला आहे. सुदैवाने या कुत्र्याने कुणाला चावा घेतला नाही. रुग्णालयात अशा पद्धतीने मोकाट कुत्र्याचा वावर मात्र, रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतो. विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना त्यांच्याच जिल्ह्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात,असे गंभीर चित्र असेल, तर मात्र राज्यभर काय स्थिती असेल? याचा विचार न केलेला बरा. दरम्यान, या प्रकारावर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.