जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी खाटा वाढणार – जिल्हाधिकारी

जळगाव प्रतिनिधी । वाढत्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांसाठी वाढीव खाटा दोन दिवसात सुरु करण्यात येणार आहे. तसेच कोरोना विरहित रुग्णांना डिस्चार्ज देऊन “नॉन कोविड” सेवा इतर दवाखान्यात हलविण्यात येत आहे. शुक्रवारी १९ मार्च रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भेट देऊन माहिती जाणून घेतली. 

जिल्हयात कोरोना महामारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून शासकीय रुग्णालय पुन्हा पूर्ण कोविड करण्याविषयी प्रशासनाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राऊत यांनी भेट देऊन रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. अरुण कसोटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे प्रामुख्याने उपस्थित होते. 

यावेळी रुग्णालयातील कोरोनाविषयीची सद्यस्थिती आणि कोरोना विरहित दाखल असणाऱ्या रुग्णांची व ओपीडीची सद्यस्थिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, कोविड इन्चार्ज डॉ. विजय गायकवाड यांच्याकडून जिल्हाधिकारी राऊत यांनी जाणून घेतली. अडचणी समजून घेतल्या. कमतरता असल्याने मनुष्यबळाविषयीदेखील माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. वॊर्ड क्रमांक ७,८,९ येथे दोन दिवसात ६५ खाटा उपलब्ध करता येणार असून सी १ हा कक्ष लवकर बंद करण्यात येईल व त्याठिकाणी अपघात विभाग कालांतराने स्थलांतर करण्यात येणार आहे, असा निर्णय यावेळी झाला.

“नॉन कोविड” रुग्णांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालय किंवा मनपाच्या शाहू महाराज दवाखाना येथे हलविणे सुरु करण्यात आले आहे. त्या ठिकाणी रुग्णांना वैद्यकीय सुविधा घेता येणार आहे.  ऑक्सिजन टॅंकचे वेळापत्रक करावे, जेणेकरून वेळेवर पुरवठा करणे शक्य होईल अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व विषाणू निदान व संशोधन प्रयोगशाळाचा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा लॅब इन्चार्ज डॉ. शुभांगी डांगे यांचेकडून घेतला. कोरोना नमुने तपासणी बाबत त्यांनी माहिती जाणून घेत अडचणी समजून घेतल्या. येथे आणखी एक नमुना तपासणी केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात येईल तसेच आवश्यक ती साधनसामुग्री व मनुष्यबळ उपलब्ध केले जाईल असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले. यावेळी बधिरीकरण शास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप पटेल, डॉ. आस्था गणेरीवाल, अधिसेविका कविता नेतकर  उपस्थित होते.

 

 

Protected Content