पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर टीका करणाऱ्या विरोधी पक्ष आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्यासारखे घरकोंबडा बनून रहायचे का, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर पुढे बोलताना म्हणाले की, निकाल बाजूने लागला तर कोर्ट चांगले, विरोधात गेला की टीका करणे योग्य नाही. जर ठाकरे गटाला निकाल पटला नसेल तर त्यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जावे. विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला असल्याचे लोकांमध्ये संभ्रम करण्यासाठी तुम्ही चुकीचा पायंडा पाडत आहात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, जनाधार गमावल्यामुळे विरोधक हतबल झाले असून चुकीचा पाढा पाडण्याचं काम ठाकरे गट करीत आहेत. मात्र महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून चाललेल्या टीकेला उत्तर देताना पडळकर म्हणाले, दावोसमध्ये मुख्यमंत्री यांनी 3 लाख कोटींचे करार केले जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासारखे घरकोंबडा बनून घरात बसायचे का? त्यांनी महाराष्ट्रासाठी काही काम करायचे का नाही ? असेही त्यांनी म्हटले आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, अधिवेशन काळात विरोधी पक्षाची भूमिका तुम्ही बजावत नाही. अधिवेशनात बोलायचे नाही आणि जेव्हा मुख्यमंत्री एकदा प्रोजेक्ट आणण्यासाठी परदेशात गेले तर टीका करायची नाही, ही दुतोंडी भूमिका विरोधकांची असल्याचे पडळकर म्हणाले.