महाराष्ट्रातही करा जातीनिहाय जनगणना : छगन भुजबळ

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी केली असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे.

बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरुवात केलेली आहे. याच धर्तीवर बिहारप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागणी केली.

या म्हटले आहे की, महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची आमची गेल्या कित्येक दिवसांपासूनची मागणी प्रलंबित आहे. जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे. मात्र, इतर मागासवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे राज्य शासनाने बिहार सरकारप्रमाणे ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी. ब्रिटिशांनी भारत जिंकला तेव्हा पहिले काम केले ते म्हणजे दर १० वर्षांनी त्यांनी जातनिहाय जनगणना सुरू केली. १८७१ ते १९३१ अशी ६० वर्षे हे काम नियमितपणे होत असे. १९४१ च्या महायुद्धात हे काम विस्कळीत झाले. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसुचित जाती व जमाती यांची जातनिहाय, तर इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचे धोरण स्विकारले. यातून मागासवर्गीय ओबीसी वंचित राहिले आहेत, असा आरोप छगन भुजबळ यांनी या पत्रात केला आहे.

Protected Content