काकणबर्डी- खंडोबा महाराजांचा यात्रोत्सव उत्साहात

पाचोरा – नंदू शेलकर |   हिवाळ्यात मार्गशीर्ष मासाची सुरवात होताच पाचोरा तालुक्यात काकणबर्डीवर चंपाषष्टीला खंडोबाच्या यात्रोत्सव असतो. त्याच अनुषंगानेआज २९ नोव्हेंबर रोजी परिसरात यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला.

 

पाचोरा शहरापासून अवघ्या २ ते ३ कि. मी. अंतरावर व गिरड रस्त्याच्या कडेला उत्तरेस असलेल्या टेकडीवर पौराणिक कथेचा आधार असलेल्या व महादेवाच्या अनेक अवतारांपैकी खंडोबा अवताराचे मंदिर आहे. कथानकातील अख्यायीकेनुसार याच टेकडीवर खंडोबाने केलेल्या दुसर्‍या विवाहाचे हाताचे काकण सोडले असल्याने या टेकडीला “काकणबर्डी” असे नाव पडल्याची कथा प्रचलित झाली. आज २९ नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यात चंपाचष्टीला येथे मोठ्या भक्तीभावात भाविकांकडून मंदिरास रंगरंगोटी, रोषणाई, झेंडूची फुले, “येळकोट येळकोट जय मल्हार” च्या गजरात हळद – खोबरे उधळून मल्हारी मार्तंडची तळी उचलून आरती व सदानंदाचा येळकोट – येळकोट चा गजर भाविक घरोघरी करून भरीत व बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य चढवित मोठ्या भक्तिभावाने यात्रोत्सव साजरा करण्यात आला. काकणबर्डीवर खंडोबाच्या दर्शनास तालुक्यासह जिल्हाभरातून सर्वच स्तरातील व समाजाचे लहान मोठे, बाल गोपाळ, स्त्री, पुरुषांसह भाविकांनी दर्शन घेतले. टेकडी सह परिसरात खेळणी, पाळणे, हलवाईच्या हाँटेल्स, रसवंती,  दुकाने थाटली होती. तसेच भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्याची सोय व व्यवस्था शहरातील सामाजिक मंडळाकडून केली होती. यात्रेत शेव- मुरमरे, गुळाची जिलेबी व रेवड्या या खाद्य पदार्थांसह खंडोबावर उधळण्यासाठी हळद व खोबरा, झेंडूच्या फुलांच्या माळांची मोठ्या प्रमाणात विक्री होवुन लाखो रुपयांची उलाढाल या अनुषंगाने झाली आहे. यात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पाचोरा पोलिस स्टेशनचे एक पी. एस. आय. तीन ए. पी. आय. यांचेसह पाचोरा, पहुर व पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे ३० पुरुष पोलिस कर्मचारी, ३ महिला पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Protected Content