गणेशोत्सवात डीजे बंदी ! : नियमांचे पालन करा – पोलीस प्रशासनाचे निर्देश

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शासनाच्या निर्देशानुसार आगामी गणेशोत्सवात डीजेला परवानगी मिळणार नसून सर्व भाविकांनी नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करावा असे आवाहन पोलीस प्रशासनाने शांतता समितीच्या बैठकीत केले आहे.

येथील वाणी मंगल कार्यालयात शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी मंचावर डीवायएसपी सुनील नंदवाळकर, निरिक्षक विजय शिंदे, सहा.पोलीस निरीक्षक विकास शिरोळे,गांधलीपुरा चौकीचे इंचार्ज हरिदास बोरसे,पीएसआय अक्षदा इंगळे,अनिल भुसारे,न प चे प्रशासन अधिकारी संजय चौधरी,आरोग्य निरीक्षक संतोष बिर्‍हाडे,अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत व महावितरण चे अधिकारी उपस्थित होते.

सुरवातीला पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी शहरात शांतता प्रस्थापित केल्याबद्दल डीवायएसपी आणि पोलीस निरीक्षक यांचे आभार व्यक्त करून या गणेशोत्सवात जे मंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते शांतता प्रस्थापित ठेवण्यासाठी सहकार्य करतील त्यांना गणेशोत्सव आटोपल्यावर सन्मानित करा अशी सूचना मांडली. पालिकेचे संजय चौधरी यांनी पालिकेतर्फे देण्यात येणार्‍या सुविधेची माहिती दिली,याव्यतिरिक्त सपोनि हरिदास बोरसे, विजू मास्तर,पंकज चौधरी,राजेंद्र चौधरी यांनी काही सूचना मांडल्या.

याप्रसंगी ोलताना डीवायएसपी नंदवाळकर म्हणाले की खरेतर समाज सुधारणेसाठी उत्सव सुरू झाले,मात्र आताच्या गणेश उत्सवात भक्ती व पूजा राहिली नसून वेगळेच काहीतरी सुरू झाले आहे,तुम्हाला भक्तीच करायची असेल तर ती श्रद्धा पूर्वक करा, सर्वात महत्वाचे म्हणजे परवानगीसाठी ऑनलाइन फॉर्म अवश्य भरा. मंडळाची कार्यकारिणी जवाबदार अशीच करा, आपसातील वाद असतील तर ते आधी मिटवा, सर्व मंडळांना एकाच ठिकाणाहून सुविधा मिळतील याचा प्रयत्न आम्ही करू,मंडळात पर्यावरणपूरकच मूर्ती स्थापन करा.११ फुट पेक्षा कमी आरास ठेवा,पावसामुळे स्थापनेचे शेड चांगले असावे,विसर्जनाची वेळ पाचव्या,सातव्या आणि नवव्या दिवशी १० पर्यंतच असेल फक्त फक्त अखेरच्या दिवशी १२ पर्यंत मुभा राहील. वाद्य आवाजाची मर्यादा ओलांडू नका,विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर धक्का स्टार्ट नसेल याची काळजी घ्या, गणपती विसर्जला १८ वर्षाच्या आतील मुले घेऊ नका आदी सूचना त्यांनी केल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे यंदा शासनाच्या निर्देशानुसार डीजेला बंदी लावण्यात आल्याने कुणालाही याची परवानगी मिळणार नसल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, पो. नि. विजय शिंदे यांनी सूचना मांडताना सांगितले की या उत्सवात प्रशासन तुमच्या सोबत आहे,आम्ही सर्व विभागाचे लोक या उत्सवासाठी अहोरात्र मेहनत घेणार आहोत,तुमच्यात कुणी दोन चार लोक गरबड करीत असतील तर त्यांच्यावर वचक ठेवा,गणेशाची स्थापना करताना रहदारीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्या,कोणत्याही डी जे परवानगी मिळणार नसून साऊंड सिस्टीमची परवानगीही रात्री १० पर्यंतच आहे,उत्सवात राजकारण बाजूला ठेऊन समाज कारणास प्राधान्य द्या,देखाव्यातुन वाद होणार नाही याची काळजी घ्या,त्यातून प्रबोधन झाले पाहिजे आणि तीच खरी गरज आहे,हे अमळनेर माझं नाही तुमचे आहे याचे भान ठेवा, विसर्जन मार्गावर हुल्लडबाजी नको,विसर्जन मिरवणूक वेळेत काढून वेळेत संपवा,अमळनेरात संस्कृती आणि विचारांचा वारसा आहे,गुरुजींची ही भूमी आहे त्यामुळे येथे चुकीचे वर्तन होता कामा नये असा इशारा त्यांनी दिला.

सदर बैठकीस गणेश मंडळाचे असंख्य पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार गोपनीय शाखेचे  शरद पाटील यांनी मानले.बैठक यशस्वीतेसाठी सर्व पोलीस कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Protected Content