अनुभूती विद्या निकेतनमध्ये ‘दिवाळी मेळा 2025’ उपक्रमाचे आयोजन


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता उद्यमशीलतेचा अनुभव घेत स्वतःची उद्योजकतेची पावले टाकावीत, यासाठी अनुभूती विद्या निकेतन आणि अनुभूती बाल निकेतनच्या वतीने यंदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘दिवाळी मेळा 2025’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळा १२ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ४ ते ७ दरम्यान शाळेच्या परिसरात पार पडणार असून, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि व्यावसायिक क्षमतेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरणार आहे.

‘अनुभूती उद्यमिता कार्यक्रम’ अंतर्गत होणाऱ्या या मेळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे मॉन्टेसरी ते इयत्ता पहिलीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले खाद्यपदार्थ, हस्तकला आणि कला वस्तूंचे सादरीकरण व विक्री होणार आहे. या सर्व वस्तूंचे नियोजन, निर्मिती, ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि विक्री या सर्व प्रक्रियेत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सक्रिय सहभाग असेल. प्रत्येक स्टॉलसाठी विद्यार्थ्यांनी स्वतःचा ब्रँड नाव व लोगो तयार केला असून, मुलांनी यामध्ये दाखवलेली कल्पकता पाहण्यासारखी असेल.

या उपक्रमात अशोक जैन, अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन यांच्यासह जैन कुटुंबियांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी पालक, शिक्षक आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना योजना आखणे, समस्या सोडवणे, ग्राहकांशी व्यवहार करणे, बाजारपेठ समजून घेणे आणि नफा-तोट्याचा विचार करण्याचे मोलाचे शिक्षण मिळणार आहे. त्यामुळे लहान वयातच आर्थिक साक्षरता, सर्जनशीलता, संवाद कौशल्य, जबाबदारी आणि आत्मविश्वास या जीवनावश्यक कौशल्यांचा विकास घडेल.

‘दिवाळी मेळा 2025’ हा एक केवळ प्रदर्शन नसून विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष उद्योगाचे मैदान ठरणार आहे. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीत उद्यमशीलतेची बीजे पेरली जात असून, भविष्यात हेच विद्यार्थी नवभारताचे सक्षम उद्योजक बनतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.