
भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिवाळीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून भुसावळ येथे यंदा ‘जय मातृभूमी प्रतिष्ठान’ संचलित ‘जय मातृभूमी मंडळा’च्या वतीने एका आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष किरण कोलते यांच्या पुढाकाराने आयोजित या ‘सोनसकाळ सुरांची दिवाळी पहाट’ कार्यक्रमाला भुसावळकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली.
हा सुरेल कार्यक्रम दिवाळीच्या पहाटे ठीक ७.०० वाजता जय मातृभूमी भुसावळ येथे पार पडला. कार्यक्रमाच्या औपचारिक उद्घाटनासाठी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि रजनी सावकारे यांच्या प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उद्योजक मनोज बियाणी, किरण कोलते, किशोर कोलते तसेच सीआरएमएसचे अधिकारी आणि कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक अनुराग जगताप, श्रुती जोशी आणि कार्यक्रमाचे संयोजक-गायक किरण सोहळे यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सुमधुर आवाजात विविध गाणी सादर केली. पहाटेच्या शांत वातावरणात संगीताची ही मैफल चांगलीच रंगली. गणेश देशले आणि अन्य कलाकारांनी त्यांना दमदार साथसंगत केली.
सुरेल गीतांनी न्हाऊन निघालेल्या या सांस्कृतिक सोहळ्याने भुसावळकरांच्या दिवाळीच्या उत्साहात भर पडली. जय मातृभूमी मंडळाने आयोजित केलेल्या या दर्जेदार कार्यक्रमामुळे उपस्थित श्रोत्यांनी मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले.



