जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या २०२६ च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून जळगाव जिल्ह्याने यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ८५.२५ टक्के लागला असून हजारो विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य आणि प्रथम श्रेणीत यश मिळवत जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा जळगाव जिल्ह्यातून इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी एकूण ५८ हजार ३९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५८ हजार ७८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला प्रविष्ट झाले. परीक्षेनंतर जाहीर झालेल्या निकालानुसार ४९ हजार ५१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ८५.२५ इतकी नोंदवली गेली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांनी मेहनतीच्या जोरावर चांगले यश मिळवले असल्याचे चित्र दिसून आले.

निकालाच्या आकडेवारीनुसार, विशेष प्राविण्य श्रेणीत तब्बल १३ हजार ३८९ विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे. तसेच प्रथम श्रेणीत १८ हजार ७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून द्वितीय श्रेणीत १४ हजार ६८ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. पास क्लासमध्ये ३ हजार ९८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
यंदाच्या निकालात विद्यार्थ्यांनी विज्ञान, गणित आणि इंग्रजी विषयांत विशेष प्रगती केल्याचे शिक्षकांकडून सांगितले जात आहे. अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही कठोर परिश्रम घेत उत्कृष्ट गुण मिळवले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढल्याने शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल होत असल्याचेही शिक्षण तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
निकालानंतर विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाच्या दृष्टीने विविध शाखांकडे वाटचाल सुरू केली आहे. विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखांसोबतच तांत्रिक शिक्षण, आयटीआय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढताना दिसत आहे. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत शिक्षकांचे आभार मानले आहेत.



