महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न

जळगाव –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा बैठक रविवारी ९ ऑक्टोंबर रोजी नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती.

 

बैठकीला निरीक्षक म्हणून राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी आणि वैज्ञानिक जाणीव प्रकल्प विभागाचे राज्य कार्यवाह प्रा. डी.एस.कट्यारे हे उपस्थित होते.  प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक डॉ. व्ही.आर.पाटील, शहराध्यक्ष प्रा. दिलीप भारंबे यांची उपस्थिती होती. प्रसंगी मानसिक आरोग्य विशेषांक अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी डॉ. प्रदीप जोशी यांनी  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ जगभरात पोहोचली आहे. समितीच्या कामांमध्ये अधिक ऊर्जा आणि बळ निर्माण होण्यासाठी कार्यकर्त्यांनी शाखांवरती सातत्याने सक्रिय राहणे आवश्यक आहे. समितीच्या आयोजित होणाऱ्या शिबिरांना आणि शाखा भेटींना कार्यकर्त्यांची उपस्थिती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र चौधरी यांनी प्रस्तावना केली.  यानंतर प्रा. डी.एस. कट्ट्यारे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या दिवाळी अंकाबाबतचे नियोजन आणि नागपूर येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीचा वृत्तांत मांडला. यानंतर जिल्ह्यातील विविध शाखांनी त्यांच्या कामांचा आढावा घेत अहवाल सादर केला.

पुढील काळामध्ये फटाके मुक्त दीपावली अभियान, मानसिक आरोग्य दिन सप्ताहाचे उपक्रम, विवेक वाहिनीचे कार्यक्रम, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची शिबिरे तसेच जिल्ह्यातील शाखा भेटी आणि नवीन शाखा निर्मितीबाबत नियोजन करण्यात आले. प्रसंगी जामनेर शाखेला लीड शाखा घोषित करून त्याबाबतची माहिती मध्यवर्तीला पाठवणार असल्याचे प्रा. कट्यारे यांनी सांगितले.

सूत्रसंचालन आणि आभार जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी यांनी मानले. बैठकीला जिल्हाभरातील विविध शाखेतील कार्याध्यक्ष, प्रधान सचिव आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीसाठी हेमंत सोनवणे, विजय लुल्हे, आर. एस. चौधरी, मीनाक्षी चौधरी, ऋषिकेश शिंदे, आनंद ढिवरे, सुभाष सपकाळे आदींनी परिश्रम घेतले.

 

Protected Content