जिल्ह्यात युरियाचे पुर्नवितरण करणार – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव जिल्ह्यात २० हजार मेट्रिक टन युरियाचा साठा उपलब्ध आहे. मात्र तरीही काही भागात युरियाची तुटवडा जाणवत आहे.‌ तेव्हा जिल्ह्यात युरियाचे पुर्नवितरण करण्यात येईल. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

 

जिल्हा नियोजन समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत युरियाच्या खतांच्या तुटवड्याबाबत आमदार किशोर पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर जिल्हा परिषद व कृषी विभागाच्या माहितीत तफावत दिसून आली. याबाबत माहिती जाणून घेतली असता जिल्ह्यात २० हजार मेट्रिक टन युरियाचा साठा उपलब्ध आहे. मात्र युरियाचे खरीप हंगामाच्या सुरूवातीला व्यवस्थित वितरण न‌ झाल्यामुळे तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे जास्त पाऊस झालेल्या जिल्ह्यातील उत्तर भागातून कमी पाऊस झालेल्या दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये युरियाचे पुर्नवितरण करण्यात येईल. याबाबत जिल्हा परिषद व कृषी विभागाला सूचना देण्यात आली आहे.

 

खतांचे लिंकिंग व काळाबाजार झाल्याच्या अद्याप जिल्ह्यातून तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. कृषी विभागाच्या पॉश प्रणालीमुळे प्रत्येक कृषी केंद्रावर असलेला खतांचा साठा दिसून येतो. त्यामुळे काळाबाजार होण्याची शक्यता कमी आहे.‌असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

सुरक्षित फवारणी रथाचे उद्घाटन – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व सिजेन्टा इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेला ‘सुरक्षित फवारणी रथ’ या फवारणी विषयी जनजागृती करणाऱ्या रथ तयार करण्यात आला आहे. या रथाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित व पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.संभाजी ठाकूर उपस्थित होते. हा रथ जिल्ह्यात फिरणार असून फवारणी करतांना घ्यावयाची दक्षता व काळजी याविषयी जनजागृती करणार आहे.‌

Protected Content